झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना....
आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून बसलेले बरेच जण पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले.....
खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली....
सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये तेंडुलकर आउट झाल्यावर जितका उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं....
पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय.... समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई.....
रोज एक नवीन कारण कळायचं....
आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार....
कधी घरात जीन्स वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ??
मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली...
एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी ....
तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे…
अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? '
इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….
एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित …
एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या उमेदवारा इतका फरक होता…
ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे…
संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते…
(मी बाजारात चुकून गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात )
मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला …
मी - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ??
आई - अरे त्यात काय फसवलं ?
मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब…
आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं …
रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले…
अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ??
मॉर्निंग शो च्या त्या मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ??
मन शांत झालं आणि विचार चालू झालें …
वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे…
इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ??
खरं तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि…
माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं )
मी गमतीने म्हणालो अरे १ एप्रिल ला भेटलो होतो , मग काय होणार…
तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली … छान …
वाटलं तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं …
(विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … )
(वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल. किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती )
हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ?? पण आपण हे सगळ बघतच नाही ना लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं …
पत्रिकांचे गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता …
ता. क. :- सदरचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)…