Monday, November 23, 2015

कट्यार काळजात घुसली ...


एक अप्रतिम  आणि अविस्मरणीय अनुभव… श्वास  पासून वेगळ्या वाटेवर चालू लागलेल्या मराठी चित्रपटांचा प्रवास नजर लागावा असाच आहे… आणि या प्रवासातला मेरुमणी ठरावी अशी एक कलाकृती म्हणजे "कट्यार" …


 माझी पिढी हि संगीत नाटकांचे युग संपल्यावर जन्माला आलेली … त्यामुळे संगीत नाटक या गोष्टीशी तसा परिचय नव्हताच … जरी साहित्य आणि संगीताची ओढ होती आणि संगीत नाटक किंवा शास्त्रीय संगीत या गोष्टींबद्दल  कुतूहल होते तरीसुद्धा त्यांच्याशी जवळून परिचय झालाच नाही … भीमसेन जोशींची ओळख केवळ त्यांच्या अभंगांमधून असलेला आणि पुण्यात राहूनही सवाई गंधर्व मध्ये कधी न गेलेला असा मी….  "कट्यार" , संगीत  किंवा शाकुंतल हि नावं  बहुतेक वेळा पुलंच्या साहित्यातून किंवा  आजोबांच्या (त्यांच्या लहानपणीच्या) गोष्टीं मधून कानी पडत आली … त्यांच्या बद्दल कुतूहल होतंच , पण त्यांचा अनुभव   घेण्याचा योग आज पर्यंत आला नव्हता … पहिल्यांदा संगीत नाटकाची ओळख झाली ते बालगंधर्व मध्ये… कुतूहल होतंच… त्याचे रुपांतर आवडीत झाले… आणि आज "कट्यार" पाहिल्यावर तर या परंपरेच्या प्रेमातच पडलोय…

सुबोध भावे, अस्सल पुणेरी संस्कृतीत वाढलेला, पुरुषोत्तम करंडकच्या वातावरणाचे संस्कार झालेला आणि पुलं, भीमसेन यांच्या वारशावर हक्क सांगू पाहणाऱ्या पिढीचा एक बिनीचा शिलेदार … त्याच्या अभिनयाबद्दल शंका कधीच नव्हती… ते त्यानी "बालगंधर्व" आणि "लोकमान्य" मध्ये सिद्ध केलंय …
पण  इतकी शिदोरी  असली तरी "कट्यार" करायला वाघाचं काळीज पाहिजे … कारण "कट्यार" म्हणलं कि डोळ्यांसमोर  उभी राहतात "पंडित वसंतराव देशपांडे", "पुरुषोत्तम दारव्हेकर" आणि "पंडित जितेंद्र अभिषेकी " (तिघांतले दोन पंडित आहेत बरं) अशा मातबरांची  नावं … त्यांच्या दर्जाला साजेल, शोभेल अशी कलाकृती करणं खायचं काम नाही (विश्वास बसत नसेल तर आठवा शोले चा  रिमेक किंवा भन्साळी चा देवदास) … पण आज "कट्यार" बघून आलो आणि वाटलं, सुबोध जर भेटला तर त्याला कडकडून मिठी मारावी आणि म्हणावं "मित्रा जिंकलस"…

"कट्यार" ची  फ्रेम  भव्य आहेच, त्याला उच्च निर्मिती मुल्यांची आणि ताकतीच्या कलाकारांची जोड सुद्धा आहे… पण त्यापेक्षाही जास्त खूप काही  आहे … दिग्दर्शकाची चित्रपट माध्यमाची असलेली जाण  आणि त्याच वेळी ""कट्यार"" वर असलेलं प्रेम प्रत्येक ठिकाणी जाणवतं … सचिन आपल्या  आयुष्यातली एक अजरामर भूमिका करून गेला आहे … त्याने रंगवलेला खान   साहेब बघताना आपण त्याचं मराठीपण विसरतो आणि त्याची हिरोची प्रतिमा कुठेही दिसत नाही … शंकर महादेवनचा अभिनय बघून, "हि  त्याची पहिलीच भूमिका आहे" यावर विश्वास ठेवणं निव्वळ अशक्य … त्याने साकारलेले राजस, कलाप्रेमी आणि तरीही नम्र पंडितजी निव्वळ अप्रतिम … परिस्थितीविरुद्ध बंड करून उठणारा, थोडासा  उतावीळ पण  गुरूंवर निस्सीम प्रेम, नव्हे भक्ती, असलेला सुबोधचा सदाशिव सुरेखच … अमृता खानविलकर नाच न करता सुद्धा सुंदर दिसते आणि मृण्मयी देशपांडे आपल्या संयत अभिनयाचा ठसा सोडून  जाते …
संगीत हा तर "कट्यार" चा आत्माच आहे… पण चित्रपटात रुपांतर करताना गाण्यांचे कथेवर आक्रमण होणार नाही आणि कथेच्या मागे गाण्यांची फरफट होणार नाही याची खबरदारी घेतल्याबद्दल "कट्यार" च्या टीम चे विशेष अभिनंदन"… खर तर "कट्यार" मध्ये अजून काही गाणी असती तर संगीत प्रेमींचे कान अजून तृप्त झाले असते … पण अशी हुरहूर वाटणे हे सुद्धा "कट्यार" चे यशच आहे …


सुरुवातीला रीमा लागुच्या आवाजातील कट्यारीचं मनोगत ऐकल्यापासून ""कट्यार"" आपल्या मनाचा ताबा घेते ते अगदी शेवटपर्यंत…  सुरुवातीला ऐकू येणारं "सूर निरागस हो" हे गाणं म्हणजे तर ""कट्यार""  च्या कथेचा आत्मा आहे… आणि हेच शब्द climax ला ऐकू येतात तेव्हा दिग्दर्शकाची पाठ थोपाटाविशी वाटून जातं … खांसाहेबांची एन्ट्री होताना त्यांच्या आणि पंडितजींच्या संगीतातील द्वंद्व, आहाहा … संगीत स्पर्धेतील खांसाहेबांनी अत्यंत आक्रमत आणि नजाकत भरी "दिल कि तपीश" ऐकून तोंडून नकळत वाह निघून जातो … त्यावर पंडितजींनी आपल्या संयत आणि मृदू गायकीत पेश केलेलं "घेई छंद मकरंद" तर निव्वळ अप्रतिम … गीताची ताकत हि हरकती आणि आक्रमकतेमध्ये नसून  शब्द आणि सुरांमध्ये आहे हे या अद्वितीय जुगलबंदीतून अनुभवून कान अक्षरशः  तृप्त होतात …   आणि त्याच वेळी पुढे सुरु होणारी जीवघेणी स्पर्धा आपल्याला आत अस्वस्थ करून जाते …

climax ला घेतलेली जुगलबंदीसुद्धा अशीच सुरेख … खांसाहेबांच्या प्रत्येक हरकतीवर मुहतोड जवाब देणारा सदाशिव जेव्हा "घेई छंद मकरंद" "सुरत पिया कि" च्या तालावर म्हणू लागतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो… चित्रपट बघणाऱ्या कितीतरी आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणी तरारतं आणि अंगावर शहारा येतो , नकळत आपलेही डोळे पाणावतात आणि भरल्यासारखे आपण उभे  राहून टाळ्यांच्या गजराला साथ देत त्यात हरवून जातो …

multiplex मध्ये मराठी चित्रपटाच्या शेवटला कडकडून टाळ्या पडतात आणि standing ovation दिलं जातं हे दृश्य खरच सुखावणारं आहे …

प्रत्येकाने (किमान) एकदा तरी बघावाच असा हा नितांतसुंदर आणि झपाटून टाकणारा अनुभव आहे … आणि यासाठी सुबोध आणि टीमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत …


© - चिन्मय जोशी