Sunday, May 22, 2016

ओरखडे आणि चरे ….



जानेवारी महिन्यातील गोष्ट … चक्क रविवारच्या पहाटे (हक्काची) झोप-बीप सगळ सोडून मी मुंबई हून पुण्याच्या प्रवासाला निघालो … अर्थात त्या मध्ये सुद्धा स्वार्थ होताच … ११-१२ पर्यंत पुण्यात पोचलो तर रविवारची हक्काची मिसळ मित्रांच्या कंपू सोबत गप्पा मारत खाणे "हेचि फळ मम तपाला " मिळण्याची आशा मनी धरून मी ट्रेन मध्ये पाय ठेवला …

खिडकीची जागा, पहाटेचा गारवा (मुंबई मध्ये या वर्षी स्वेटर ची तडाखेबंद विक्री झालेली आहे - त्या मुळे थंडी होती हि गोष्ट पुराव्याने शाबित … ) अस सगळं जुळून आलं आणि मी लवकरच समाधी अवस्थेत प्रवेश केला… (ज्ञानेश्वरांचा रेडा होतास मागच्या जन्मी म्हणून इतक्या पटकन समाधी लागते तुझी - इति आई )
आजूबाजूचा गोंधळ, मुलांचे आणि फेरीवाल्यांचे आवाज सवयीचे झाले होते त्यामुळे त्याने झोपमोड होण्याचा प्रश्नच नव्हत… पण थोड्याच वेळात डब्ब्यात एक (लोणावळा) चिक्की, शेंगदाणे फुटाणे ई विकणारा माणूस आला …
(विषयांतर- खांबेटेखुर्द नावाच्या गावात जिथे दिवसातून एकच यष्टी येते, तिथे सुद्धा मिळणारी चिक्की लोणावळ्याचीच कशी काय असते बुवा ?? विषयांतर समाप्त )
त्याने entry मारल्याबरोबर त्याच्या खड्या  आवाजाने मी जागा झालो … जवळपास १५-२० मिनिटं तो तिथेच उभा राहून चिकाटीने  आणि त्याच्या दणदणीत आवाजात त्याच्या "मालाचं" मार्केटिंग करत होता… त्या खड्या (खरं तर भसाड्या) आवाजाने मी जवळपास दचकुनच डोळे उघडले …
"भट्टी मधून आणलेले शेंगदाणे घ्या , ताजे ताजे शेंगदाणे" "मुगाची डाळ घ्या, पचायला हलकी, प्रोटीन युक्त , डॉक्टरांची पण लाडकी" "बेसन मसाला लावलेले दाणे, चटका लावतील जिभेला आणि जड नाही खिशाला" अशी अथक बडबड चालू होती … खरं तर मी झोपमोड झाल्याने वैतागलो होतो … पण ५ मिनिटं गेली आणि मी त्याचं ते मार्केटिंग कुतूहलाने बघायला लागलो … सतत ओरडून त्याला तहान लागली असेल असं वाटत होतं … म्हणलं घ्यावे थोडे दाणे आणि विचारावं पाणी हवं  आहे का … पण अंगातल्या पांढरपेशा अलिप्ततेने जणू हात बांधून  घातले आणि तो निघून गेला ….

नंतर मनाच्या आरशावर पडलेला तो चरा किती तरी वेळ मला अस्वस्थ करत होता …

असे किती चरे आणि किती ओरखडे घेऊन आपण जगात वावरतो आणि नंतर नंतर त्यांचीही सवय होऊन जाते … त्रास होईनासा होतो …
रस्त्याकडेला एखादी म्हातारी केविलवाण्या चेहऱ्याने उभी असते… हातात मोठी पिशवी आणि वर उन्हाचा तडाखा …  रस्त्यावरचे सगळे स्वार बाजीरावाने घोडा पळवावा अशा थाटात दौडत असतात … वाटत बाईक थांबवून म्हातारीला रस्ता ओलांडून द्यावा… पण वेगात असलेली गाडी तितक्यात पुढे निघून जाते आणि आपण परत फिरून यायचं टाळतो … स्लो असतो तर केली असती मदत या खोट्या बहाण्यानी आणि अजून एका ओरखड्याची नक्षी घेऊन आपण पुढेच जातो …
कार घेऊन जाताना लिफ्ट मागायला थांबलेले हात, "मला काहीच दिसलं नाही " अशा आविर्भावात आपण झिडकारतो … मिळतो फक्त एक चरा ….

आई - बाबा सांगत असतात, अरे कधी तरी वेळ काढ … घराची सफाई करून घेऊ दिवाळी आधी … आपल्याला वेळ मिळत नसतो …शेवटी वैतागून तेच सफाई करून घेतात जमेल तशी … संध्याकाळी घरी गेल्यावर दिसतात ते दिवसभरच्या कामाने दमून गेलेले तरी कोणतीही तक्रार नसलेले चेहरे …

हे चरे आपल्याला सतत त्रास देत असतात … आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे हे सगळं  तुम्ही कोणाशीच शेअर नाही करत … कारण त्यात तुमचीच इमेज खराब होणार असते … म्हणून हातात घुसलेल्या लाकडाच्या सडि सारख ते आपल्याला टोचत राहत … रक्त येत नाही आणि जीवाला स्वस्थता पण नाही …

असेच ओरखडे पडत पडत आपल्या समोरचा आरसा धुसर होत जातो … आपण मुळात असे नाहीये हे माहित असतं पण तरी आपल्या समोरचा आरसा आपलं खरं रूप दाखवत असतोच …

असो, आता ठरवलंय समोरचा आरसा स्वच्छ करायचा … रोज एक तरी चरा  कमी करायचा … बघूया किती जमतंय ते …