Wednesday, August 29, 2018

आमचे उपासाचे प्रयोग …

आमचे उपासाचे प्रयोग …

एक आटपाट नगर होतं (अशी सुरुवात केली कि नक्की किती दिवसापुर्वीची गोष्ट आहे याची चौकशी होत नाही असा अनुभव आहे) . तिथे अस्मादिक मंडळींचे दोनाचे चार हात करायची गडबड सुरु झाली होती (चाणाक्ष मंडळींनी बडबड असे वाचावे) …

मुलींच्या बाबतीत तसा मी पहिल्या पासून लाजराच… एखादी चुकून स्वताहून बोलायला आलीच तर शोएब अख्तर च्या बोलिंग समोर वेंकटपथी राजूने बैट्टींग करावी तशी आमची बोबडी वळायची …. म्हणून प्रेमविवाह प्रकार घरच्यांनी इशांत शर्माच्या ब्याटिंग इतकेच ऑप्शन ला सोडले होते … तसा पगार वगैरे बरा होता आणि शिक्षण सुद्धा (चिकाटीने) पूर्ण झालेलं…. त्यामुळे लवकरच आमच्या "वधू संशोधन" मोहिमेला यश आलं  आणि माझ्या हातांची संख्या दुप्पट (आणि पगार निम्मा कट) होण्याचा मुहूर्त निघाला …

मित्रांनी लग्न ठरलं म्हणून पार्टी उकळली (तसंही ठरलं नसतं  तर दुःख हलकं  करायला द्यावीच लागली असती) … आणि पार्टी मध्ये एकाने बॉम्ब टाकला … चिन्या (हे माझं ग्रुप मध्ये घेतलं जाणारं सगळ्यात आदरयुक्त नाव आहे … बाकीची नावं टाकल्यास ब्लॉग सेन्सॉर होण्याची शक्यता आहे… बाकी समजून घेणे)… चिन्या लेका लग्नाचे फोटो आयुष्यभर दाखवावे लागतात … बारीक हो जरा …

आता खाल्ल्या मिसळीला ज्याने जागावे तोच असं अभद्र काहीतरी बोलून गेल्यावर वातावरण एकदम सिरियस झाले … अवध्या नामक मित्राने त्याला तिथल्या तिथे झापले … "तुला डोक-बिक काही आहे का ?? पार्टी ला बसलोय ना आपण ??"…
जवळपास २-३ मिनिटे भयाण शांततेत गेली आणि अवध्या पुन्हा बोलला "तुला जे काही बोलायचे ते त्याने बिल भरल्यावर बोल"… 
झाले !!!

दुसऱ्या दिवसापासून आमचे "डाएटपुराणाचे" अध्ययन सुरु झाले …
बटाटा वर्ज्य, बाहेर खायचे नाही (मिसळ बंदी) आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दाणे-गुळ चघळणे बंद … हे सगळे नियम वाचून या पेक्षा १३, १७, १९, २३ आणि २७ चे पाढे पाठ करणे सोपे असा साक्षात्कार मला झाला ...

या सगळ्यावर कडी केली ती म्हणजे व्यायामाने … सकाळी ६ ला उठून पळायला जाणे …
 पहिल्या दिवशी इतक्या पहाटे मी मैदानात आलेला बघून आमच्या इथले २-३ आजोबा चक्कर येउन पडले आणि साक्षात सुर्यनारायणाने लाजेने आपले तोंड ढगाच्या मागे लपवले … सलग २-३ दिवस पाउस पडला आणि प्रथमग्रासे मक्षिकापातः या न्यायाने मी एका आठवड्यानंतर का होईना नियमित (आठवड्यातून ३-४ वेळा) व्यायामाला सुरुवात केली …

उपवासाची पथ्य पाळणे सुरुवातीला तसे सोपे वाटले … एकदम सगळं डाएट फॉलो करणं शक्य नसल्याने पहिले बाहेरचे खाणे कमी करायचे ठरवले … २-३ आठवडे गेले बरे पण मित्रांना भेटायला गेलो कि रोज आग्रह व्हायचा , नाही खाल्ले तर पुन्हा "अजून किती दिवस तू येणारेस, लग्न झालं कि कुठला भेटतो तू ??" असं इमोशनल ब्लैकमेल सुरु … नाही तरी किती वेळा म्हणणार ना? मग त त्यातल्या त्यात डाएट च समाधान म्हणून मित्रांनी २ वडा-पाव खाल्ले तर आपण एकच खाणे, चहा अर्धा कटिंग घेणे असे आमचे चालू होते .. पण चतुर्भुज होण्याची तारीख ३ महिन्यावर आली तरी आमच्या एकूण आकारमानात काही फरक दिसेना ... त्यात शेजारच्या आजोबांनी जरा प्राणायाम आणि योगासन कर ... मी बघ या वयात सुद्धा कसा स्लिम आणि ट्रिम आहे ... असा उपदेश केला आणि योगासने नावाच्या अवघड प्रकारची ओळख झाली ... (खरं  तर ते आजोबा स्लिम ट्रिम आहेत, पण त्याच रहस्य डायबेटिस मुले बंद झालेलं  गोडधोड आणि कवळी मुळे कमी झालेलं जेवण हे आहे ... असो... असते एकेकाची बढाई मारायची सवय... ).

योगासन हा प्रकार खरं म्हणजे दिसायला खूप सोपा वाटलं होता ... पण शवासन सोडून कोणतेच आसन मला जमेना (खरं तर शवासन देवानेच शिकवून पाठवले होते - त्यामुळे शवसनातून मला जागृत अवस्थेत आणायला घरच्यांना फार त्रास होत असे )... अंगाच्या चित्र विचित्र गाठी मारायच्या आणि त्या पुन्हा सोडायच्या .. ते सगळं जमायला तुम्ही मुळातच बारीक आणि लवचिक असावं लागत ... आणि ज्यांना ते जमतं  ते बघून बाकीच्या लोकांना वाटत कि तो योगासनांचा इफेक्ट आहे ... जाऊदे ...

मी मनावर घेतलं .. ठाम निश्चय केला आणि एक वेळ जेवण बंद असं घरी सांगितलं ..
पण केळवण या गोंडस नावाखाली माझा हा निश्चय सुद्धा मोडून काढला गेला ... (तसे आयुष्यातले बरेच निश्चय मोडण्यासाठीच असतात जसे कि , कधीच लग्न न करणे, मोठेपणी  बस चा ड्राइवर किंवा कंडक्टर होणे ई.)...

असो तर भरपूर प्रयत्नांती आमची उपासाची गाडी रडतखडत का होईना सुरु झाली ...
उपसामध्ये किती तरी नवीन गोष्टींशी परिचय झाला ...
आयुष्यात पहिल्यांदा निग्रहाने समोर आलेल्या मिसळीला नाही म्हणताना सांगून आलेलं ऐश्वर्या रायचं स्थळ नाकारल्याचे भाव चेहऱ्यावर उमटले होते ...
साखर आणि दूध न घातलेला आरोग्यकारी ग्रीन टी आणि पूजेच्या वेळी जबरदस्ती करून पाजलं जाणारं गोमूत्र हे एकाच चवीचे असतात हे समजून आले ...   (एखादी गोष्ट जितकी जास्त बेचव तेवढी जास्त आरोग्यकारी - इति डॉक्टर... )
बटाटा आणि बेसन या दोन गोष्टी वर्ज्य केल्या तर भारतात जगणे अशक्य आहे यावर माझा विश्वास बसला ... आणि सगळयात महत्वाचे म्हणजे, दोन दिवसाच्या भरपेट जेवणाने हवा भरलेल्या फुग्यासारखे पटकन फुगणारे पोट , कमी होताना मात्र गोगलगायीपेक्षा हळू हळू कमी होते ...
नाश्त्याला मिसळ, पोहे किंवा बटाटावडा सांबर च्या ऐवजी कॉर्नफ्लेक्स खाताना कपाळकरंटेपणा या शब्दाचा डिक्शनरी बघूनही ना समजलेला अर्थ समजला .... नेहमीच्या टपरीवर चहा प्यायला गेलो असताना मी बिना साखरेच्या चहाची ऑर्डर दिल्यावर चहावाला अण्णा फिट येऊन पडायचा राहिला होता...

पूर्वीच्या काळी जे ऋषी-मुनी उपास करायचे त्यांना देव लगेच का वरदान द्यायचे ते मला अक्षरशः पटले …

असो... तर इतका आटापिटा करून कणभर का होईना, आत गेलेलं पोट बघून किंचित समाधान वाटायचं ...

पण फोटोग्राफर नावाच्या नतद्रष्ट प्राण्याला तेही सुख मंजूर नसावं ... कारण खुद्द लग्नाच्या दिवशी बायको समोर लाज काढायचं पाहिलं काम त्या प्राण्याने (माझ्याकडूनच भरपूर पैसे घेऊन) अगदी नेमकं पार पाडलं ...
"अहो, जरा पोट आत घ्या आणि मान सरळ करा " या एका वाक्याने माझी ४ महिन्याची सगळी मेहनत पूर्ण पाण्यात गेली होती ... आणि हे इतकं बोलून परत "स्माईल प्लिज" म्हणायचे धाडस निव्वळ हातात कॅमेरा असल्याने तो करू शकला आणि आमचा (कसनुसा) हासलेला फोटो काढला...

भरपूर पैसे मोजून (आणि वर  खुशी वेगळी देऊन) ते फोटो ताब्यात घेतले आणि तेव्हा पासून आज पर्यंत डाएटच्या वाटेला गेलो नाही ...