मराठी ...
नुसतं इतकं म्हणलं तरी आई च्या कुशीत येऊन बसल्याचा भास होतो असा हा शब्द ...
कोणी त्याला संस्कृती म्हणालं तर कोणी भाषा, कोणी मराठीला स्वतःची अस्मिता मानलं तर कोणी बाणा ... पण सर्वात समर्पक उपमा मिळाली ती मात्र "माय मराठी" ...
या जगाशी ओळख करून देणारी .. आपल्या चिमुकल्या भावनांना व्यक्त करण्यातून सृजनाचा आनंद देणारी माय ..
बोबड्या बोलांनी बडबड गीते म्हणताना, बे एके बे म्हणत अंकांशी गट्टी करताना, मराठी बाणा म्हणजे काय हे शिवाजीच्या इतिहासातून शिकताना आणि स्वातंत्र्याचे मोल स्वातंत्र्यवीरांच्या उस्फुर्त आणि अद्भुत स्वरातून अनुभवताना या आईचा पदर धरूनच मोठा कधी झालो हे कळलंच नाही ...
या मराठीच्या समृद्ध विश्वाचा आस्वाद घेताना "किती देशील दोन्ही करांनी" या म्हणीचा खरा अर्थ उमगला ...
या आईची रूपे तरी किती सांगावी ...
पहाटेच्या वेळी ऐकू येणारी वासुदेवाची वाणी, भीमसेनी स्वरांनी सजलेले अभंग, जात्यावर दळण दळताना सहज रचलेल्या ओव्या, विठ्ठलाच्या भक्तिरसात तल्लीन होऊन म्हणाला जाणारा हरिपाठ, कीर्तन आणि प्रवचन, समाज प्रबोधनासाठी रचलेली भारुडं, पराक्रमी पुरुषाचे पराक्रम शब्दातून समोर उभी करणारी शाहिराची जोरदार कवनं, मोगऱ्याचा गजरा गुंफावा तसे नाजूक तरी भावपूर्ण सुगम संगीत, शृंगाराची झलक दाखवणारी तरी खानदानीपणाची कास न सोडणारी लावणी, तुलसीदासांच्या रामायणाइतकेच अदभूत आणि सुंदर गीत रामायण...
पुलंच्या विविधरंगी लिखाणातून जसे मराठी मनाचे अंतरंग उलगडतात तसेच वपुंच्या अलंकारिक शब्दांनीं तिचे अनघट सौंदर्यवती रूप अनुभवले...
आज मराठी दिनाच्या निमित्ताने खूप शुभेछया आल्या.. बऱ्याच शुभेच्छांचा सूर एकूणच निराशावादी होता ... बदलत्या काळाने केलेले आघात आपली मायमराठी सहन करू शकेल का हि शंका दिसत होती .. मुलांना मराठी शाळेत घालायला पाहिजे ... इंग्रजीचा हट्ट सोडून द्या वगैरे ...
काळ बदलला, तशी भाषा पण बदलली... खोली, दिवा, गच्ची, नाश्ता इत्यादी शब्द हल्ली ऐकायला पण मिळत नाहीत ... इमारत, स्थानक वगैरे तर अश्मयुगातले शब्द वाटतात ... वाटत कि आपली इतकी सुंदर भाषा खरंच अजून ४०-५० वर्षे तरी टिकेल कि नाही ... "मायमराठी" ची मदर मराठी ना होवो म्हणजे मिळवलं ...
बदलत्या काळाप्रमाणे बदलत जाणे हा तर कोणत्याही भाषेचा स्थायीभाव ... आणि म्हणूनच मराठी अजूनही टिकून आहे, राहील ... जो पर्यंत चांदोमामा, गणपतीबाप्पा, उंदीरमामा, झुकझुकगाडी लहानग्यांना भुरळ घालत राहतील, दिवेलागणीला शुभंकरोती म्हणाले जाईल , आरती साठी सुखकर्ता दुःखहर्ता ला पर्याय नसेल तो पर्यंत तरी माझी मराठी दिमाखातच असेल... म्हणून माझा सूर निराशावादी नाहीये..
पण आज या आईच्या आठवणीने एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते... निदान तिचा अपमान नका करू ...
मराठी मधून शिकणाऱ्या मुलांना थर्ड क्लास समजणं, रिक्षावाल्याशी आणि वेटर शी बोलताना स्वतःहून हिंदीत बोलणं, मुलांना अ आ इ ई च्या आधी A B C D शिकवणं आणि वर या सगळ्याचा अभिमान बाळगणं बंद करा ... अगदी टेबल ला "मंचक" आणि गॅलरी ला "सज्जा" म्हणायची गरज नाहीये..आणि सगळ्यांनी मराठी शाळेत शिकावं अशी अपेक्षा पण नाहीये... पण निदान तिची उपेक्षा करू नका .. माझ्या मुलाला मराठी जास्त समजत नाही, आम्ही त्याच्याशी इंग्लिशमध्येच बोलतो, हे सांगण्यात धन्यता कसली मानता?
प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हे मान्य... म्हणून कोणावर सक्ती करून काहीही साध्य होणार नाही... पण निदान आपण चार चौघात मराठीला प्रतिष्ठेने वागवले तर सोशल प्रेशर मुळे झेपत नसतानाहि इंग्रजी कडे जाणाऱ्यांचा ओघ तरी थांबेल...
घरी किंवा कार मध्ये मराठी संगीत ऐकणं , मराठी पुस्तके नियमित आणणं, एखाद्या वेळी मराठी नाटकाला जाणं, कधी एखाद्या गडावर आपल्या चिमुकल्याला नेऊन तिथल्या इतिहासाची माहिती करून देणं.. आठवड्यातून एखादे वेळी श्लोक, शुभंकरोती किंवा स्तोत्र म्हणणं, एखादी अंगाई म्हणून किंवा "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ची गोष्ट सांगत मुलांना झोपवणं .. इतकं केलं तरी हि खूप होईल ...
आपल्या आधीच्या कितीतरी पिढ्यांनी खूप कष्ट घेऊन हा ठेवा समृद्ध केला आहे... भले त्यात भर घालणं नसेल जमत आपल्याला, निदान आहे ते तसंच जपून ठेऊ आणि आपल्या चिमुकल्यांना देऊ ...
कोणास ठाऊक त्यांच्यातीलच कोणी गदिमा, कुसुमाग्रज किंवा राम गणेश गडकरी होऊन आपल्या आईचे पांग फेडेल ...