Saturday, April 27, 2013

कांदे पोहे … एक अनुभव…



झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना....
आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या  कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून  बसलेले बरेच जण  पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले.....

खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली....
सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये  तेंडुलकर आउट झाल्यावर जितका  उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं....

पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय....  समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून  फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई.....
 रोज एक नवीन कारण कळायचं....

आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार....
 कधी घरात जीन्स  वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ??

मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम  मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली...

एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी ....
तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे…

अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा  किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? '
इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
 इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….


एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित …

एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या  उमेदवारा इतका फरक होता…
ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे…

संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं  घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड  निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते…
(मी बाजारात चुकून  गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात )
मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला …

मी  - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ??
आई  - अरे त्यात काय फसवलं ?
मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब…
आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं … 

रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले… 

अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ??
मॉर्निंग शो च्या त्या  मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ??

मन शांत झालं आणि विचार चालू झालें …
वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे…
इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ??

खरं  तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि…

माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं  )
मी गमतीने म्हणालो  अरे  १ एप्रिल ला भेटलो होतो , मग  काय होणार…
तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली  … छान …
वाटलं  तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं …
 (विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … )
(वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल.  किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती )

हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ??  पण आपण हे सगळ बघतच नाही ना  लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं …


पत्रिकांचे  गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता …

ता. क. :- सदरचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे  चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)…


अब्रू - दिल्लीतली आणि घरातली

आज लिहावसं वाटलं काहीतरी परत एकदा.... कारण पण तसंच झाल...
ब्लॉग आणि फेसबुक वर महिलांवर होणाऱ्या अत्याचारा  विषयी  चीड व्यक्त होताना पाहिली … महिलांची अब्रू जपायला हवी हे सगळ्यांनाच पटतंय … मला पण … पण त्यांचा एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आदर ठेवायला नको का ??

सरकारला शिव्या देणारे आणि बलात्कार करणार्यांना फाशी द्या म्हणणारे किती जण आपल्या घरी आपल्या आईला, पत्नी ला सन्मानाने वागवतात ??

6 महिने आधीचा एक प्रसंग आठवला ….
सकाळी सिंहगड पकडली आणि निघालो माझ्या वूड बी ला भेटायला मुंबई ला... सिंहगड चा एक डब्बा चिंचवड पासून सुरु होतो... रविवार म्हणून आमची स्वारी निवांत होती... आणि रिझर्वेशन वगैरे करून भारतीय रेल्वे ची रिकामी तिजोरी भरायचा कंटाळा आल्या मुळे ४९ रु चे तिकीट कडून अस्मादिक जनरल च्या डब्ब्यात ( रिझर्वेशनची बोगी आणि जनरलचा डब्बा हा फरक पण आपली क्लास सिस्टीम दाखवून जातो नाही ??) दाखल झाले....
आत चढायला माधुरी दीक्षित ला भेटायला होणार नाही इतकी गर्दी होती, आणि त्यातच एक बाई आपल्या २ वर्षाच्या मुलीला घेऊन आत चढायला धडपडत होती.... आणि ज्याची भीती वाटत होती तेच झालं.... गाडी थांबायच्या आधी धक्का-बुक्की करत चढणाऱ्या गर्दीने त्या बिचारीला असा धक्का दिला कि ती गाडीच्या आणि फलाटाच्या मधून पडलीच जवळ जवळ.... कशी बशी वाचली ती... दोघा तिघांनी हात दिला आणि आत चढली ति… . ती तिची मुलगी आणि तिचा नवरा... दारापाशीच बसकण मारली त्यनि…
मरण समोर पाहून आलेली तीचे हात पायच गळून गेले होते…  ... तिला एका म्हातारीने पाणी दिलं.... वाटलं सावरेल थोड्या वेळात....
तिच्या नवर्याने मात्र काही न पाहता जे काही आरडा ओरडा करायला सुरुवात केली... तिचा, तिच्या माहेरचा सगळ्यांचा मनसोक्त शिव्या घालून उद्धार केला..... आणि ती बिचारी काही न बोलता मुक्त मान गुढघ्यात घालून रडत बसली....
का??
इतक्या गर्दीत त्याने तिला आधार द्यायला नको होता का??
गर्दीने तिच्या स्त्रीत्वाचा नाही, पण जवळच्या लहान मुलीचा विचार करून तिला आधी जाऊ द्यायला नको होतं ??
पण नाहि…. चूक तीचिच … कारण ती एक स्त्री आहे…

खरच आपण इतकं गृहीत धरतो का स्त्री ला ?? स्वतःला विचारून बघा ना ....!!
किती वेळा आपण आपला राग आई वर काढतो ?? ती कधी बोलते आपल्याला ??
किती वेळा आपण बहिणीला ओरडतो , "तुला नाही कळत काही, गप्प बस...".... !!!!
हेच आपण बाबांच्या अंगावर ओरडू शकतो का ??

इतकं का सहन करतात सगळ्या स्त्रिया ... ??

खर सांगू ?? मला तर नेहमी हेच जाणवत आलाय कि आपण आपल्या समाजात योग्य स्थान नाही देत "बाई" ला....
नुसती त्यांची अब्रू वाचवली म्हणजे झालं का??
मन नावाचं काही नसतच ना ??

आठवून बघा … किती वेळा आपण प्रवासात एका खऱ्या  गरजू  बाईला जागा दिली आहे … (गरजू म्हणजे कॉलेज सुंदरी नव्हे )…
किती वेळा आई चे पाय दुखतात म्हणून चेपून दिले आहेत ?? चेपून द्यायचं राहूदे विचारायच तरी कधी लक्षात आलय का ?? नाही ना ??
कारण बायकांनी कामं करायचीच असतात … तडजोड त्यांनीच केली पहिजे…
आणि … त्यांना कशाला कधी काही विचारावं लागत… ?? आपण काही विचारपूस नाही केली तरी त्या काही संपावर जात नहित…

मुलगा तिशीत आला तरी चालत… पण मुलीचे हात पिवळे करायची घाई …. 
एखादीच  बाशिंगबळ जड असेल तर तिला बोलून इतके हैराण करणार कि बस ….

मुलाला स्वतःच्या  चड्डीची घडी घालायची अक्कल नसेल तरी चालत… पण मुलीने स्वयपाक जर बिघडवला कि तिच्या माहेरचा उद्धार सुरु…

आणि घरात स्त्रियांचा इतका  आदर (??)  सन्मान (??) करणारे जेव्हा दिल्लीतल्या अत्याचाराविषयी  बोलतात तेव्हा त्यांचा मानभावीपणा बघून तिडीक उठते ….

अब्रू तर जपली पहिजेच ओ …. पण त्याहून जपायला हव ते आपल्यातल माणूसपण , संवेदनाक्षम मन…


Tuesday, August 28, 2012

पंचाईत



हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते ....
काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ...

आता हेच बघा ना,  परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या  जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ??

आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ??

खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ...
खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही ....

असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ  चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?"
इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं  , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा  वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो ....
पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं  हे मात्र खरं ....
इथे पण माझंच काहीतरी चुकलं का??
मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ??
तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ??  टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??

Wednesday, August 22, 2012

संताप, चीड, राग आणि निराशा...

आज इथे लिहिताना माझ्या मनात संताप, चीड, राग आणि निराशा दाटून आली आहे.... खर सांगायचं तर ती गेले ६ वर्ष अशीच दाटून येते....
आपण लोक इतके भावना आणि संवेदना शून्य कसे झालो हेच काळात नाहीये....
मुंबई वर अतिरेकी हल्ला झाला, आणि सगळा देश पेटून उठला... त्याच दिवशी आपले भावी पंतप्रधान पार्टी मध्ये मश्गुल होते.... आपण काय केले ?? काही नाही ......
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच नाटक बघून सगळे खुश झाले.... पण तेव्हाच मुख्यमंत्र्याला केंद्रात बढती मिळाली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली....
परत परत किती वेळा संताप व्यक्त करायचा ??
या देशाचा राष्ट्रपती बलात्कार आणि खुनाच्या दोषींना माफी देतो.... प्रधानमंत्री हे तर वेगळच प्रकरण आहे.... बाजीराव पेशव्याच्या काळात भारतात निर्माण झालेल्या या पदाला आताच्या प्रधानामंत्र्यान  इतकी नालायक दुसरी व्यक्तीच नसेल....
सहकार्यांनी भ्रष्टाचार केला, हे गप्प... एका हेकेखोर मुख्यामंत्र्यापायी बांगलादेशला दुखावले तर तमिळ लोकांच्या भावनांसाठी श्रीलंके सारखा मित्र गमावला....
पाकिस्तान ने इतक्या उचापती करून पण आपण पुराव्यांच्या झेरॉक्स त्यांना देण्या पलीकडे काहीच नाही केले.... (फक्त स्कॅम वरून लक्ष हटवण्या साठी क्रिकेट खेळायला बोलावतोय त्यांना)...पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती दिसून आल्या तरी आपण क्रिकेट खेळायला तयार ..... मुंबई मध्ये जे मारले गेले, शहीद झाले त्यांच्या बलिदानाची हि क्रूर थट्टा आहे असा कोणालाच नाही वाटत का ??

मध्ये वाटल होता कि अण्णा हजारे काहीतरी करतील.... या बधीर system ला हलवून सोडायची ताकत आहे त्यांच्यात.... पण हा हा म्हणता मुरलेल्या राजकारणी लोकांनी त्यांचा माकड केलं....
स्वतःच्या शक्तीची शिकार झालेल्या भास्मासुरासारखेच वाटले ते मला.... 

कायद्याची थट्टा  खुले आम सगळी कडे चालू आहे, आम्ही हताश पणे बघतोय....
परवाची गोष्ट....
आसाम मध्ये दंगल झाली आणि त्याला विरोध म्हणून मुंबई मध्ये सभा .... त्या नंतर माथेफिरू लोकांनी मोड-तोड जाळपोळ केली....
अरे कोण कुठले परदेशी लोक, त्यांच्या साठी तुम्ही आपल्या देशाच्या संपत्तीच नुकसान करता ??
धर्म मोठा का देश ??
आणि आपले गृह मंत्री काय करतात ?? तर ईद होई पर्यंत अटक करू नका म्हणून सांगतात... पोलिसांच्या संयमाच कौतुक करतात....
दिवसा ढवळ्या महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला जातो.... ३०-४० जण त्यांना बाजारू स्त्रियांपेक्षा वाईट वागवतात... सगळ कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतंय... तरी कारवाई नाही ....
हाच का तो शिवरायांचा महाराष्ट्र ??

राष्ट्रवादी च नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राष्ट्राचा विचार कधी केलाय का ??
आपले गृह मंत्री तर दिव्यच आहेत....
भुजबळ साहेबांनी भ्रष्ट करून सोडलेल्या गृह खात्याला निष्क्रियतेच वरदान दिलाय....  सत्ताधारी पार्टीच गुंडांच समर्थन करते.... ८-१० भ्रष्ट मंत्री आहेत सरकार मध्ये,..... आपण मात्र आनंदात आहोत....नुसते षंढ माणसासारखे बघत बसलोय.....

एका हवालदाराला पुढे येऊन राज ठाकरेंच अभिनंदन करावस वाटल...  त्याच्यावर कारवाई होईल हे माहित असूनही.... यातच सगळं नाही आलं का ??
मुलाचा सांभाळ जर बापच करू शकत नसेल तर मुलगा दुसरी कडे आसरा शोधतोच ना ??
आपण काय करतोय पण ?? तो हिंदू, हा मुसलमान इतकंच ?? आधी आपण भारतीय आहोत हेच कुठे तरी विसरत चाललो आहोत... आणि असा असेल तर काय फरक आहे रझा अकादमीच्या माथेफिरुंमध्ये आणि आपल्यात ??

आणि हे सगळं बदलायला काय करणार आपण ??
२०१४ ला तरी काहीतरी विचार करून मतदान करणार आहे का आपण ?? का २०१९ पर्यंत असाच स्वतःवर चिडत, आत मध्ये कुढत जगायचं ??

Friday, August 17, 2012

Shayari

बेचैन से दिल से गुजारीश क्या करे ?
दोस्तोन को बयान हाल-ए-दिल क्या करे ?
अगर मेहेरबान हो जाये दिलबर हमारा,
तो भला ये नादान शायरी क्या करे ??