Thursday, May 15, 2014

बालपणीचा काळ सुखाचा.....


बालपणीचा काळ  सुखाचा म्हणतात … पण आपण लहान असताना ते पटत नाही आणि नंतर कळून फायदाच नसतो…
पण तरी खूप काही मिळत आपल्याला आपण लहान असताना …

अर्थात मला माझ्या लहान पाणी सगळ्यात जास्त मिळालेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मार आणि बोलणी … पण त्यात माझा काही दोष नव्हता …
लहानपणी काय करायचं नाही हे जवळ जवळ प्रत्येक जण सांगायचा … पण आम्ही उद्योग करून रिकामे झाल्यावर …(आधी सांगितलं तर बहुधा आपल्याला भोगायची शिक्षा सावध करणाऱ्याला भोगायला लागत असावी … )

असो… तर त्या रम्य बालपणीचा काल (शिक्षांसाहित) आठवून आज खूप काही बोलावस वाटलं …. म्हणून शेवटी ब्लॉग खरडायला घेतला …

माझ्या लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो… एकच खोलि… हल्लीच्या FLAT मधलं स्वयंपाक घर असत ना, तेवढीच …
उभ राहील आणि हात वर केला कि हात (खोलीच्या) आभाळाला टेकायचे (माझे नाही, मोठ्यांचे)…
पण ते घर अजून स्वप्नात येतं … तिथेच पहिले सवंगडी जमले…एक  तीन चाकी सायकल आणि एक जुना डालडयाचा  डब्बा आणि एखादी झिपरी बाहुली  एवढ्या साहित्यावर  सगळ्या चाळीतली तमाम प्रजा खुशीत खेळत असे… भांडण आणि मैत्री शब्द सुद्धा माहित नव्हते तेव्हा … भूक लागली कि घरी येउन खायचं, पाणी प्यायचं आणि परत खेळायला पळायचं …. तेव्हाचे किती तरी सवंगडी आता आठवत पण नहित … काहीतरी हरवल्याची जाणीव मात्र होत असते…

नंतर मग आम्ही एका २ रूम च्या स्वताच्या FLAT मध्ये गेलो… इथे तर खूप सारे समवयस्क मिळाले होते …आई-वडिलांची  मुलांच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी गच्ची होतिच… दिवस दिवस भर उन्हातान्हात गच्चीवर, मैदानात खेळताना कधी सावळा होण्याची भीती नव्हती आणि कधी गोरा होण्याची इच्छा पण नव्हति… दिवसभर गच्चीत खेळायचं , वाटेल तेव्हा घरी येउन पाणी प्यायचं … संध्याकाळी शेजारच्या मैदानात मोठ्या दादा लोकांमध्ये क्रिकेट खेळायच… batting चा  चान्स मिळावा म्हणून २-२ तास कीपिंग करायची … घरी आल कि राजेशाही थाटात हादडायला बसण … ते पोह्याचे बकाणे भरणं … ऐटीत चालू होत सगळं….

मग अचानक एक दिवस शाळा नावाच्या एका गोष्टीशी ओळख झाली … सगळीच लहान लहान मुल… आणि एकसारखेच कपडे घातलेली…. मी पहिल्याच दिवशी रडून इतका गोंधळ घातला कि बाईंना आईला तिथेच बसवून ठेवावं लागला (यालाच बाळाचे पाय पाळण्यात  दिसणे म्हणतात का ??) … नंतर मात्र शाळेची मज्जा वाटायची … रंगांची नवे, मातीचे आकार, भाज्यांची नावे, अंक, बाराखडी  आणि पाढे (मला अजूनही १३ च्या पुढचे पाढे येत नहित… ) हे सगळ खूप खूप आठवतंय आता …

त्याच शाळेतली एक गम्मत आठवते  … अ आ इ ई शिकताना "फ" पाशी आमची गाडी अडली… कारण घरी काही आगाऊ पणा केला कि आई ओरडायची … "फ - फ फटक्यातला देऊ का …??"काकांचं सुद्धा तेच वाक्य ….
आणि बाई (तेव्हा त्यांच्या madam नव्हत्या झाल्या ) शाळेत शिकवताना "फ रे फणसाचा " शिकवायच्या … मी मात्र जोरात "फटका च " म्हणायचो … बाईंनी ओरडून, मार देऊन सुद्धा मी मात्र "फ" रे फटक्याचा म्हणायच सोडलं नाही आणि उलट शेजारच्या मुलांना आपलंच म्हणणं पटवून द्यायला लागलो ….
शेवटी माझ्या बरोबरची सगळी मुलं  "फ - फ फटक्यातला" म्हणायला शिकली आणि माझ्या पालकांना  शालेय जीवनातील पहिले पान-सुपारीचे आमंत्रण गेले…(एकुणात जर आमंत्रणांचा हिशेब काढला तर माझ्या इतकीच हजेरी माझ्या आई-बाबांनी लावली असावी माझ्या शाळेमध्ये … )

तेव्हा आईच घरी अभ्यास घ्यायची … शिकवणी हा प्रकार मला तरी ६ वी पर्यंत माहितच नव्हता …
आणि अभ्यास सुद्धा १ तासात संपत असे… संध्याकाळी मात्र सभ्य मुलासारखं शुभंकरोती, पर्वचा आणि पाढे (१७, २३, २७ आणि २९ चा अडखळतच) म्हणावे लागायचे …

तसे माझे बाबा काही मारकुटे किंवा तापट नहियेत… पण तरी त्यांची घरी यायची वेळ झाली कि पावले आपोआप घराकडे वळायची ….


मला आठवतंय तस माझ्या बाबांनी (मी अजूनही बाबाच म्हणतो - आणि कधी कधी आदरानी "पिताश्री" किंवा "कुटुंब प्रमुख" ) मला एकदाच मारलं आहे… (आईचा रतीब मात्र न चुकता चालूच  होता )…
झाल असं होतं कि, मला सायकल शिकवायची ठरलं … आमच्या धाकट्या बहिणाबाईंनी धडपडत स्वतःच  सायकल शिकून घेतली, आणि आमचा उत्साह मात्र कुठेच दिसेन… सायकल पेक्षा "आक्क्या-टोक्क्या" आणि "डब्बा ऐस-पैस " मधेच मला मज्जा वाटायची ....
मग मात्र पिताश्रींची "सायकल प्रशिक्षण" मोहिमेवर नेमणूक झाली आणि रोज संध्याकाळी आम्ही हर्क्युलीस चे २४ इंची धूड अंगावर घेऊन धडपडू लागलो… सिटला पकडून पळताना बाबांचं पोट  हलकं झालं आणि सोफ़्रामायसिन च्या ट्युब आणून खिसा हलका  व्हायला लागला …पुढे पुढे लडखडत आमची सायकल चालायला लागली ...
एक दिवस मात्र मी त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरच सायकल आणून उभी केली, आणि तिरमिरीत त्यांनी दिली एक थोतरीत ठेउन (कुठे तो एकलव्य ज्याने आपला अंगठा कापून दिला आणि कुठे आम्ही;  सायकल शिकवणाऱ्याच्याच अंगठ्याचा अचूक वेध घेतला)… पुढचे २ दिवस गालगुंड झालाय असं खोटंच सांगत शाळेत जाव लागलं…
एकदाची सायकल जमायला लागली आणि आम्ही घरातून लान्स आर्मस्ट्रोंग च्या थाटात  सायकल वर शाळेत जाऊ लागलो …


सायकल वरचाच एक किस्सा आठवला … लहानपणी पाप आणि पुण्याचे हिशोब खूप जपले जातात … गाई च्या पोटात ३३ कोटी देव असतात असे मला सांगितलेले होते … त्यामुळे जिथे गाय दिसेल तेथे तिच्या पोटाला हात लावून नमस्कार करणे हा एक नित्याचाच भाग झाला होता … एकदा अस्मादिक शाळेला निघालेले असताना रस्त्यातल्या एका कचराकुंडीपाशी एक गो-माता क्षुधा शांती करत असताना दिसली … सायकल चालवायचा आता बऱ्यापैकी (खरं तर अति ) आत्मविश्वास आलेला असल्याने खाली न उतरता गाई च्या जवळून सायकल नेउन तिच्या पोटाला हात लावून (जाता जाता) पुण्य कमावण्याच्या प्रयत्नात मी होतो … मी जवळ आल्या बरोबर तिने आपल्या शेपटीचा गोंडा (ज्याला शेण लागून ते वाळलेले होते) माझ्या गालावरून अंमळ प्रेमाने फिरविला …. इतका अकस्मात कृपा प्रसाद मिळाल्याने पुढच्या सेकंदाला मी गो-मातेचे आशीर्वाद घेत तिच्या पायाशी (तिच्याच शेणाच्या पो मध्ये) लोळण घेतली आणि माझी सायकल कचराकुंडी मध्ये अंतर्धान पावली …. पुढचे किती तरी दिवस लग्न, मुंज, वाढदिवस, घरी आलेले पाहुणे ई. प्रसंगी चार टाळकी एकत्र जमली कि माझा हा किस्सा नक्कीच सांगितला जाई ….

असो …


आमच्या शाळेबद्दल थोडंसं … 
माझ शिक्षण मराठी मधून ७ व्या इयत्ते पर्यंत (न गचकता ) आणि  नंतर semi  इंग्लीश मध्ये(तिथेहि न गचकता) …. माझी शाळा चिंचवड मधली तशी खूप प्रसिद्ध शाळा … पण त्याला मैदान नव्हत … त्याची कसर आम्ही शाळे समोरच्या बागेत खेळून भरून काढायचो … सगळ्यात जास्त मजा यायची ती क्रिकेट मैच असेल तेव्हा … आमच्या शाळेच्या शेजारी एक चाळ  होती … त्याच्या एका घराची खिडकी बरोब्बर आमच्या वर्गाच्या खिडकी समोर यायची … आणि तिथल्या काकू मैच असेल तेव्हा खिडकीत पाटीवर स्कोअर लिहून ठेवायच्या …. त्या काकुंच नाव सुद्धा माहित नव्हत … पण मुलांचा दंगा ऐकू आला कि त्या स्कोअरबोर्ड अपडेट करून ठेवायच्या … तो स्कोअरबोर्ड आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच आहे….

परवा शाळेकडे गेलो होतो तेव्हा कळलं कि ती चाळ पाडली आहे … कदाचित त्यामुळे सुद्धा असेल किंवा तेंडूलकर रिटायर झाला म्हणून असेल, यंदाच्या  IPL मधल्या मैच मध्ये मनच रमत नाहीये …


शाळेच्या सहलीला जायचं म्हणजे तर जत्रे इतकीच धमाल मज्जा … पहिली सहल मला आठवतीये ती म्हणजे सारसबाग आणि पेशवे पार्क … पण खरी धमाल यायची गड किल्ल्यांच्या सहलीला …पहाटे ५ ला शाळेपाशी जमायचं… स्वेटर घातलेले सगळे मित्र-मैत्रिणी … बस मध्ये खिडकीची जागा पकडण्यासाठीची भांडणं … प्रत्येक स्टॉप नंतर होणारी हजेरी …. सिंहगडावर आमच्याच सरांनी दही वाल्याच्या सुरात सूर मिसळून मारलेली "दहीsssय्य" अशी आरोळी …. आईने दिलेले २० रुपये, त्यात घरी काहीतरी आठवण म्हणून घेऊन जाणं … आणि शाळेकडून काढल्या जाणारया ग्रुप फोटो मध्ये आपण दिसू का याची उत्सुकता …. खरच किती मिस करतोय हे सगळ …


शाळेत असताना सुट्टी म्हणजे तर पर्वणीच वाटायची … उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामा, काकांकडे जाणं … तिथे शेतात भटकायचं … बैलगाडी मधून लिफ्ट घ्यायची … कारखान्याला जाणार्या गाडीतली उसाची कांडकी काढून सोलून खायची … झाडावरच्या कैऱ्या पाडून खायच्या … दर वर्षी १ महिन्या पुरते भेटणारे नवे सोबती … आणि परत येतानाचा तो ६-७ तासांचा कंटाळवाणा प्रवास …
दिवाळीच्या सुट्टी मध्ये छान पैकी उटन लावून अंघोळ… नवीन कपडे, फराळ आणि फटाके … सकाळी पहिला बॉम्ब कोण फोडणार आणि कोणी किती पिशव्या भरून फटाके आणले याचीच  स्पर्धा….  भाऊबिजेला बहिणीला ओवाळणी देताना बाबांनी दिलेले १० रु सुद्धा तिला किती मोलाचे वाटायचे …


असो … तर आज सगळ आठवून खूप छान वाटलं … काहीतरी पुन्हा नवीन सापडलंय आणि बरच काही कायमचं हरवलंय …. 
पण एक मात्र खर … बालपणीचा काळ  सुखाचा हेच खर … सुख म्हणजे अजून काय असत ??

Monday, May 5, 2014

मुंबई - पुणे - मुंबई


तर मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे... अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी …

टायटलवर जाऊ नका … त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही  संबंध नाही …  
तरी स्टोरी म्हणलं  कि काहीतरी भारी असणारच कि नाही ??  तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक )  स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही... आणि मी सुद्धा त्यातलाच एक....

तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू …

मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची  ….

तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला … पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं …

तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण  आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू  इ.) पदवीधर झालो … आमचा नम्बर Accenture  नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला  (हल्ली campus selection  ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे )… आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी  (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले… आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ….

तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ….
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )

खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे  (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून)
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे … त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह… गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती  …. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो …
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)

मुंबई नगरी  मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल  ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला … MNC मध्ये  असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती … राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता … पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण … सदैव घाई गडबड आणि पळापळ … हे सगळ वेगळच वाटत होतं …
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली… त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे …

१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते …

२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते … परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ  वाचावा  म्हणून  भाडे ठरवण्यासाठी करतात  ….

३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात …
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे  पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला … असो…

४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते … परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला … असो …

५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात  … त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये  खरेदी करताना "खेकसणे"  या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते …. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)


६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात …

७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी  बोलू लागतात …. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ….


८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त  महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो …

९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे … (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे )…
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना  स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात…
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे … असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)

१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात… 
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही …)

११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत …
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत …)

१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो … व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो…

असो … जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो … . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे … मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो … (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )

टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे …. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ….
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती ….




Saturday, April 27, 2013

कांदे पोहे … एक अनुभव…



झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना....
आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या  कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून  बसलेले बरेच जण  पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले.....

खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली....
सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये  तेंडुलकर आउट झाल्यावर जितका  उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं....

पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय....  समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून  फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई.....
 रोज एक नवीन कारण कळायचं....

आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार....
 कधी घरात जीन्स  वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ??

मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम  मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली...

एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी ....
तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे…

अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा  किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? '
इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
 इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….


एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित …

एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या  उमेदवारा इतका फरक होता…
ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे…

संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं  घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड  निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते…
(मी बाजारात चुकून  गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात )
मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला …

मी  - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ??
आई  - अरे त्यात काय फसवलं ?
मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब…
आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं … 

रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले… 

अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ??
मॉर्निंग शो च्या त्या  मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ??

मन शांत झालं आणि विचार चालू झालें …
वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे…
इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ??

खरं  तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि…

माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं  )
मी गमतीने म्हणालो  अरे  १ एप्रिल ला भेटलो होतो , मग  काय होणार…
तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली  … छान …
वाटलं  तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं …
 (विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … )
(वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल.  किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती )

हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ??  पण आपण हे सगळ बघतच नाही ना  लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं …


पत्रिकांचे  गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता …

ता. क. :- सदरचा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे  चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)…


अब्रू - दिल्लीतली आणि घरातली

आज लिहावसं वाटलं काहीतरी परत एकदा.... कारण पण तसंच झाल...
ब्लॉग आणि फेसबुक वर महिलांवर होणाऱ्या अत्याचारा  विषयी  चीड व्यक्त होताना पाहिली … महिलांची अब्रू जपायला हवी हे सगळ्यांनाच पटतंय … मला पण … पण त्यांचा एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आदर ठेवायला नको का ??

सरकारला शिव्या देणारे आणि बलात्कार करणार्यांना फाशी द्या म्हणणारे किती जण आपल्या घरी आपल्या आईला, पत्नी ला सन्मानाने वागवतात ??

6 महिने आधीचा एक प्रसंग आठवला ….
सकाळी सिंहगड पकडली आणि निघालो माझ्या वूड बी ला भेटायला मुंबई ला... सिंहगड चा एक डब्बा चिंचवड पासून सुरु होतो... रविवार म्हणून आमची स्वारी निवांत होती... आणि रिझर्वेशन वगैरे करून भारतीय रेल्वे ची रिकामी तिजोरी भरायचा कंटाळा आल्या मुळे ४९ रु चे तिकीट कडून अस्मादिक जनरल च्या डब्ब्यात ( रिझर्वेशनची बोगी आणि जनरलचा डब्बा हा फरक पण आपली क्लास सिस्टीम दाखवून जातो नाही ??) दाखल झाले....
आत चढायला माधुरी दीक्षित ला भेटायला होणार नाही इतकी गर्दी होती, आणि त्यातच एक बाई आपल्या २ वर्षाच्या मुलीला घेऊन आत चढायला धडपडत होती.... आणि ज्याची भीती वाटत होती तेच झालं.... गाडी थांबायच्या आधी धक्का-बुक्की करत चढणाऱ्या गर्दीने त्या बिचारीला असा धक्का दिला कि ती गाडीच्या आणि फलाटाच्या मधून पडलीच जवळ जवळ.... कशी बशी वाचली ती... दोघा तिघांनी हात दिला आणि आत चढली ति… . ती तिची मुलगी आणि तिचा नवरा... दारापाशीच बसकण मारली त्यनि…
मरण समोर पाहून आलेली तीचे हात पायच गळून गेले होते…  ... तिला एका म्हातारीने पाणी दिलं.... वाटलं सावरेल थोड्या वेळात....
तिच्या नवर्याने मात्र काही न पाहता जे काही आरडा ओरडा करायला सुरुवात केली... तिचा, तिच्या माहेरचा सगळ्यांचा मनसोक्त शिव्या घालून उद्धार केला..... आणि ती बिचारी काही न बोलता मुक्त मान गुढघ्यात घालून रडत बसली....
का??
इतक्या गर्दीत त्याने तिला आधार द्यायला नको होता का??
गर्दीने तिच्या स्त्रीत्वाचा नाही, पण जवळच्या लहान मुलीचा विचार करून तिला आधी जाऊ द्यायला नको होतं ??
पण नाहि…. चूक तीचिच … कारण ती एक स्त्री आहे…

खरच आपण इतकं गृहीत धरतो का स्त्री ला ?? स्वतःला विचारून बघा ना ....!!
किती वेळा आपण आपला राग आई वर काढतो ?? ती कधी बोलते आपल्याला ??
किती वेळा आपण बहिणीला ओरडतो , "तुला नाही कळत काही, गप्प बस...".... !!!!
हेच आपण बाबांच्या अंगावर ओरडू शकतो का ??

इतकं का सहन करतात सगळ्या स्त्रिया ... ??

खर सांगू ?? मला तर नेहमी हेच जाणवत आलाय कि आपण आपल्या समाजात योग्य स्थान नाही देत "बाई" ला....
नुसती त्यांची अब्रू वाचवली म्हणजे झालं का??
मन नावाचं काही नसतच ना ??

आठवून बघा … किती वेळा आपण प्रवासात एका खऱ्या  गरजू  बाईला जागा दिली आहे … (गरजू म्हणजे कॉलेज सुंदरी नव्हे )…
किती वेळा आई चे पाय दुखतात म्हणून चेपून दिले आहेत ?? चेपून द्यायचं राहूदे विचारायच तरी कधी लक्षात आलय का ?? नाही ना ??
कारण बायकांनी कामं करायचीच असतात … तडजोड त्यांनीच केली पहिजे…
आणि … त्यांना कशाला कधी काही विचारावं लागत… ?? आपण काही विचारपूस नाही केली तरी त्या काही संपावर जात नहित…

मुलगा तिशीत आला तरी चालत… पण मुलीचे हात पिवळे करायची घाई …. 
एखादीच  बाशिंगबळ जड असेल तर तिला बोलून इतके हैराण करणार कि बस ….

मुलाला स्वतःच्या  चड्डीची घडी घालायची अक्कल नसेल तरी चालत… पण मुलीने स्वयपाक जर बिघडवला कि तिच्या माहेरचा उद्धार सुरु…

आणि घरात स्त्रियांचा इतका  आदर (??)  सन्मान (??) करणारे जेव्हा दिल्लीतल्या अत्याचाराविषयी  बोलतात तेव्हा त्यांचा मानभावीपणा बघून तिडीक उठते ….

अब्रू तर जपली पहिजेच ओ …. पण त्याहून जपायला हव ते आपल्यातल माणूसपण , संवेदनाक्षम मन…


Tuesday, August 28, 2012

पंचाईत



हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते ....
काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ...

आता हेच बघा ना,  परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या  जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ??

आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ??

खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण ....
मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ...
खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही ....

असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ  चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?"
इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं  , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा  वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो ....
पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं  हे मात्र खरं ....
इथे पण माझंच काहीतरी चुकलं का??
मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ??
तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ??  टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??

Wednesday, August 22, 2012

संताप, चीड, राग आणि निराशा...

आज इथे लिहिताना माझ्या मनात संताप, चीड, राग आणि निराशा दाटून आली आहे.... खर सांगायचं तर ती गेले ६ वर्ष अशीच दाटून येते....
आपण लोक इतके भावना आणि संवेदना शून्य कसे झालो हेच काळात नाहीये....
मुंबई वर अतिरेकी हल्ला झाला, आणि सगळा देश पेटून उठला... त्याच दिवशी आपले भावी पंतप्रधान पार्टी मध्ये मश्गुल होते.... आपण काय केले ?? काही नाही ......
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच नाटक बघून सगळे खुश झाले.... पण तेव्हाच मुख्यमंत्र्याला केंद्रात बढती मिळाली आणि मनात शंकेची पाल चुकचुकली....
परत परत किती वेळा संताप व्यक्त करायचा ??
या देशाचा राष्ट्रपती बलात्कार आणि खुनाच्या दोषींना माफी देतो.... प्रधानमंत्री हे तर वेगळच प्रकरण आहे.... बाजीराव पेशव्याच्या काळात भारतात निर्माण झालेल्या या पदाला आताच्या प्रधानामंत्र्यान  इतकी नालायक दुसरी व्यक्तीच नसेल....
सहकार्यांनी भ्रष्टाचार केला, हे गप्प... एका हेकेखोर मुख्यामंत्र्यापायी बांगलादेशला दुखावले तर तमिळ लोकांच्या भावनांसाठी श्रीलंके सारखा मित्र गमावला....
पाकिस्तान ने इतक्या उचापती करून पण आपण पुराव्यांच्या झेरॉक्स त्यांना देण्या पलीकडे काहीच नाही केले.... (फक्त स्कॅम वरून लक्ष हटवण्या साठी क्रिकेट खेळायला बोलावतोय त्यांना)...पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती दिसून आल्या तरी आपण क्रिकेट खेळायला तयार ..... मुंबई मध्ये जे मारले गेले, शहीद झाले त्यांच्या बलिदानाची हि क्रूर थट्टा आहे असा कोणालाच नाही वाटत का ??

मध्ये वाटल होता कि अण्णा हजारे काहीतरी करतील.... या बधीर system ला हलवून सोडायची ताकत आहे त्यांच्यात.... पण हा हा म्हणता मुरलेल्या राजकारणी लोकांनी त्यांचा माकड केलं....
स्वतःच्या शक्तीची शिकार झालेल्या भास्मासुरासारखेच वाटले ते मला.... 

कायद्याची थट्टा  खुले आम सगळी कडे चालू आहे, आम्ही हताश पणे बघतोय....
परवाची गोष्ट....
आसाम मध्ये दंगल झाली आणि त्याला विरोध म्हणून मुंबई मध्ये सभा .... त्या नंतर माथेफिरू लोकांनी मोड-तोड जाळपोळ केली....
अरे कोण कुठले परदेशी लोक, त्यांच्या साठी तुम्ही आपल्या देशाच्या संपत्तीच नुकसान करता ??
धर्म मोठा का देश ??
आणि आपले गृह मंत्री काय करतात ?? तर ईद होई पर्यंत अटक करू नका म्हणून सांगतात... पोलिसांच्या संयमाच कौतुक करतात....
दिवसा ढवळ्या महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला जातो.... ३०-४० जण त्यांना बाजारू स्त्रियांपेक्षा वाईट वागवतात... सगळ कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतंय... तरी कारवाई नाही ....
हाच का तो शिवरायांचा महाराष्ट्र ??

राष्ट्रवादी च नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी राष्ट्राचा विचार कधी केलाय का ??
आपले गृह मंत्री तर दिव्यच आहेत....
भुजबळ साहेबांनी भ्रष्ट करून सोडलेल्या गृह खात्याला निष्क्रियतेच वरदान दिलाय....  सत्ताधारी पार्टीच गुंडांच समर्थन करते.... ८-१० भ्रष्ट मंत्री आहेत सरकार मध्ये,..... आपण मात्र आनंदात आहोत....नुसते षंढ माणसासारखे बघत बसलोय.....

एका हवालदाराला पुढे येऊन राज ठाकरेंच अभिनंदन करावस वाटल...  त्याच्यावर कारवाई होईल हे माहित असूनही.... यातच सगळं नाही आलं का ??
मुलाचा सांभाळ जर बापच करू शकत नसेल तर मुलगा दुसरी कडे आसरा शोधतोच ना ??
आपण काय करतोय पण ?? तो हिंदू, हा मुसलमान इतकंच ?? आधी आपण भारतीय आहोत हेच कुठे तरी विसरत चाललो आहोत... आणि असा असेल तर काय फरक आहे रझा अकादमीच्या माथेफिरुंमध्ये आणि आपल्यात ??

आणि हे सगळं बदलायला काय करणार आपण ??
२०१४ ला तरी काहीतरी विचार करून मतदान करणार आहे का आपण ?? का २०१९ पर्यंत असाच स्वतःवर चिडत, आत मध्ये कुढत जगायचं ??

Friday, August 17, 2012

Shayari

बेचैन से दिल से गुजारीश क्या करे ?
दोस्तोन को बयान हाल-ए-दिल क्या करे ?
अगर मेहेरबान हो जाये दिलबर हमारा,
तो भला ये नादान शायरी क्या करे ??